शनिवार, ९ मे, २०१५

सोनियाबाई! लगे रहो!

दिनांक: भारतीय सौर १८ वैशाख शके १९३७, 

८ मे २०१५

'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हाती सारी सत्ता केंद्रित झाली आहे.' असा गंभीर (?) आरोप बुधवारी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केला. 'एक व्यक्ती आणि काही निवडक लोकांचे हे सरकार, आठ महिन्यांपासून स्वतःला चौकशीपासून वाचवण्यासाठी माहिती आयुक्तांची नेमणूक करण्याचे टाळत आहे.' अशी 'घणाघाती' (?) टीका सोनियांनी केली.
-मटा बातमी
७.४.२०१५

वा! सोनियाबाई वा! काय गंभीर आरोप आपण केला आहे. पण याची सुरूवात कोणी केली होती. अहो बाई! सार्‍या जगाला माहित आहे की काँग्रेसच्या काळात सत्ता कुठे केंद्रित झाली होती. टाइम मासिकाने सुद्धा तुम्हाला जगातील शक्तीशाली महिलांच्या यादीत स्थान दिले होते. ते कसे काय? कसले गंभीर (पुचाट!) आरोप करता? अहो! त्या आमच्या पंतप्रधान मनमोहन सिंगांना तुम्ही फक्त 'सह्याजीराव' करून ठेवले होते. एका वर्षातच त्याचा विसर पडला काय? स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसर्‍याचे पाहायचे वाकून -सोडून द्या असे वागणे. पटेल असे काहीतरी बोला. उगीच मगरीचे अश्रु नका ढाळू. कोणीही लक्ष देणार नाही अशाने तुमच्याकडे. मनमोहन सिंगांना नुसते 'आधुनिक वेठबिगार' बणवून ठेवले होते तुम्ही आणि तुमच्या त्या 'चंपक' मुलाने. पटेल, रुचेल असे काहीतरी बोला बाई. नाहीतर हत्ती चाललाय ऐटीत आणि तुम्ही आपले बसलाय..... बघा पटले तर. मला काय? मला एक सांगा की माहिती आयुक्तांची नेमणूक केली तर कोणाच्या जास्त चौकशा होतील? तुमच्या सरकारच्या की भाजप सरकारच्या? ते तर आत्ताच वर्षापूर्वी आलेत. 'झाकली मुठ सव्वा लाखाची' असते बाई. ती तशीच राहू द्या. कशाला 'खाजून खाजून अवधान' आणायचा प्रयत्न करताय. आमच्या पवार साहेबांकडून शिका काहीतरी. त्यांचं बघा कसं असतं. 'चित भी मेरी, पट भी मेरी.' बाकी तुम्ही समजदार आहात. लोक हसतील मलाच, तुम्हाला इतके समजावत बसलो तर. रामराम!

या मटाला पण काहीच कळत नाही. अहो कशालाही काहीही बोलता? 'गंभीर आरोप' काय? घणाघाती टीका काय? यामुळे तुम्हाला तरी कोणी गंभीरपणे घेईल काय? घण म्हणजे हातोडा. तोही मोठा हातोडा. मला तर ही स्मार्टफोनवर मारलेली टिचकी पण नाही वाटत. वापरा पण, तुम्ही वापरा. मराठी भाषेत शब्दांना काहीच कमतरता नाही. वापरायचे ते शब्द वापरा. भारीभारी शब्द वापरा. परिणाम शुन्यच आहे.

आपला हितचिंतक,
-रामदास पवार
अंबरनाथ
(८.५.२०१५)

रविवार, १५ जून, २०१४

कोल्हापुर दंगलीचे खापर मोदी सरकार वर, म्हणे दंगली घडवण्याने जिंकता येते

मटाने आता अडून अडून मोदी सरकार वर वार करण्यास सुरुवात केली आहे. गुरुवार दिनांक 5 जून 2014 च्या मटाच्या 'बहुतांची अंतरे' या वाचकांच्या सदरात दोन पत्रे अशी प्रसिद्ध केली आहेत. जी मला वाटते मोदींच्या विरोधी आहेत. मटाचा हा दुसऱ्याच्या नथीतुन बाण मारण्याचा प्रकार आहे. 

पाहिले पत्र आहे निलीमा देशपांडे यांचे. या बाइंनी 'तरच विकास साधता येईल' या मथळ्याचे पत्र लिहले आहे. या पत्रात त्यांनी लिहले आहे की 29 मे च्या अंकातील छाया दातार यांचा 'विकासाच्या भपक्याने दिपली तरुनाई' या लेखात सद्य परिस्तिथिचे अचूक विश्लेषण केले आहे. मी माझ्या मागच्या लेखात छाया दातारांच्या लेखाविषयी लिहले आहे. त्या लेखातील वाचकांच्या प्रतिक्रिया मटा ऑनलाइन वर पहिल्या तर लक्षात येईल की जवळजवळ 99% लोक बाईंच्या मताशी सहमत नाहीत. मग मटाच्या छापील आवृत्तीतीत एकही पत्र लेखविरोधी कसे नाही आणि फक्त लेखाशी सहमत असल्याचे पत्रच कसे आहे. म्हणजे आपल्याला पाहिजे ते पत्र छापून आणणे आणि आपल्या मताविरोधी पत्राला केराची टोपली दाखवणे हे मटाही करतोच. मग 'आमचा पक्षपात फक्त वाचकांशी आहे. आमची बांधिलकी फक्त वाचकांबरोबर' अश्या जाहिराती मटा कां करतो. देशपांडे बाईंच्या पत्रातील एक वाक्य 'पण त्याच बरोबर तरुनाईने ज्या पक्षाला भरगोस मते दिली त्या पक्षाच्या 'काळ्या' बाजुकडे मतदारांनी सध्या तरी दुर्लक्ष केल्याचे आढळते.' असे आहे आणि हेच वाक्य मटाला पत्र प्रसिद्ध करण्यास पुरेसे आहे.
याच मटाच्या अंकात दुसरे पत्र आहे राजीव जोशी, नेरळ यांचे 'भाजप आणि परिस्थीतीचा रेटा'. या पत्रात लिहले आहे की 'सरहद्दीपलीकडील परिस्थितीत सुधारणा झाल्याशिवाय पाकिस्तानशी कोणतीही चर्चा करण्यास भाजपाने कडाडून विरोध केला होता. परंतु सीमेपलीकडील स्थितीत काडीचीही सुधारणा न होताच पाकचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना मानाचे आमंत्रण दिले गेले, आणि भाजपाने आपल्या कोलांट्या उड्यातील नैपुण्याचे प्रदर्शन केले. भाजप व संघाने अवास्तव आणि अव्यवहार्य कार्यक्रमाची हाक दिली हे स्पष्ट होते. असा अतिरंजित कार्यक्रम घेणारे हे नेतृत्व अ-दूरदर्शी आहे? किंवा अप्रामाणिक आहे?'

आता ह्या राजीव साहेबांच्या प्रश्नाला उत्तर देण्याची गरजच नाही. नवाझ शरीफ यांना शपथविधिला बोलवणे याबद्दल वृत्तपत्रात तसेच इतर प्रसारमाध्यमांत बरीच चर्चा आणि चर्वितचर्वण झाले आहे आणि जवळजवळ सर्वांनी मोदींना शाबासकी दिली आहे.  यांत मटाही सामिल आहे (वाचा मटा अग्रलेख 'सत्तेचे भान' दि. 28 मे 2014)

या राजीव जोशी यांना 'सरहद्दीपलीकडील, सिमेपलीकडील' म्हणायचे आहे की 'सीमे- वरील' याचा उलगडा होत नाही. सिमेपली- कडील परिस्थिति बदलणे सध्या तरी कोणाच्याही पिताश्रींच्या हातात नाही. (उदा. तेथील दहशतवाद, गरीबी, अमेरिकेसमोरील लाचारी इत्यादी). दुसरे असे की आठ दिवसांत कोणालाही अ-प्रमाणिक किंवा अ-दूरदर्शी म्हणणे किंवा ठरवणे म्हणजे अतीच झाले नाही का?

मटाला काय किंवा इतर माध्यमांना काय आता पर्यंतच्या मोदींच्या करभाराविषयी प्रशंशाच करावी लागतेय. आणि म्हणून वाचकांच्या पत्रांचा व इतर लेखांचा आधार घेउन टिका करत आहेत.

आता आजचा (6 जून) मटा पहा. यांत मंथन या पानावर 'मराठी मुलखात- दक्षिण महाराष्ट्र' या सदरात एक लेख प्रसिद्ध झाला आहे. त्या लेखाचे नाव आहे 'कलहाने करवीरनगरी शरमिंदी' आणि लेखक आहेत विजय चोरमारे.
परवा कोल्हापुर शहरात तोडफोड, दगडफेक, जाळपोळ झाली. त्याचे कारण होते फेसबुक वर कोणीतरी शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे यांची बदनामी केली. चोरमारे यांनी याचे खापर शिवसेना आणि भाजप यांच्यावर फोडले आहे. त्यांच्या लिखाणाचा रोख असा आहे की शिवसेना आणि भाजप हे निवडणुकी आधी दंगली घडवतात. मागच्या वेळेस मिरजेला दंगल झाली त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका होत्या. दंगलीचा फायदा शिवसेना अणि भाजप यांना झाला. म्हणून या पक्षांचे नेते तरुण मुलांची माथी भडकवतात व हळूच पलायन करतात. ते म्हणतात 'मागच्या वेळेस दंगलीनंतर भाजपने मिराजेची जागा खेचून आणली. मिरजेबरोबर सांगली जिल्ह्यातील सांगली आणि जत या जागाही भाजपने जिंकल्या. कोल्हापुर जिल्ह्यातील इचलकरंजी भाजपने तर हातकनंगले राखीव मतदारसंघ शिवसेनेने जिंकला. हे सगळे मिरज दंगलीचेच फलित होते, हे नाकारता येत नाही.'

आता प्रश्न असा पडतो की निवडणुकीचे राजकारण इतके सोपे आहे काय? की घडवा दंगल आणि या निवडून. मग काय प्रचार करायला नको, पैसा खर्च करायला नको, भाषणबाजी नको की काही नको. महाराष्ट्रातच काय तर संपूर्ण भारतात तीन चतुर्थांश मतदार संघ असे असतील की जेथे दंगली घडू शकतात. मग अता पर्यंत भाजप दंगली घडवून संपूर्ण भारतात निवडून आली असती. तेच शिवसेनेविषयी महाराष्ट्राबाबत म्हणता येईल. आणि कॉंग्रेस मुक्त भारताचे स्वप्न 50-60 वर्षां पुर्वीच पूर्ण झाले असते.

लेखकाला हेही ज्ञात नसावे की ही तोडफोड, जाळपोळ फक्त कोल्हापुर मधेच न होता, महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी झाली आहे. आणि कोणताही महाराष्ट्रात जन्मलेला मनुष्य शिवरायांची बदनामी स्वत:हुन निवडनुक जिंकन्यासाठी करणार नाही.

तसेच दंगलच करायची होती तर ती लोकसभा निवडणुकी पुर्वीही करता आली असती, मग आताच का याचं काय उत्तर लेखाकापाशी आहे. लेखाचा शेवट लेखकाने कसा केला आहे तो पहा. 'राजकीय गरजेपोटी असे प्रसंग भविष्यात घडतील, घडवले जातील. त्या शिवाय, काही घटकांना अच्छे दिन आल्याची जाणीव होणार नाही'. हा सरळ भाजपावर आरोप आहे.

म्हणुनच म्हणतोय  मटासारख्या कॉंग्रेस धर्जिन्या लोकांची धडपड चालू झाली आहे. आणि ती विधानसभा निवडणुकी पर्यंत चालूच राहील.

सोमवार, २ जून, २०१४

काविळ झालेल्यास सर्व पिवळे दिसते !

दिनांक 2 जून, 2014 च्या महाराष्ट्र टाइम्स मधे   मोदी सरकार बद्दल चार लेख आहेत. या सर्व लेखांमधे विरोधी सुर पूर्णत: दिसत नाही तरीही तोलून मापून टिका केलेली दिसते. माझ्या मागच्या लेखात लिहाल्या प्रमाणे छाया दातार यांच्या लेखात जसा पूर्ण विरोधी सुर होता तसा या लेखांत नसला तरी सुरुवात झाली आहे असे म्हणता येईल. आपण एकेक लेख घेऊ या.

आजकाल मटात अग्रलेखाचे दोन भाग असतात. दोन्ही अग्रलेख वेगवेगळ्या विषयावर असतात. पहिल्या भागातील अग्रलेखात राज ठाकारेंवर उखडले आहेत तर दुसऱ्या भागात प्रकाश जावडेकर यांच्यावर. आपण दुसऱ्या अग्रलेखा बद्दल बोलणार आहोत. या अग्रलेखाचे शिर्षक आहे ' ज्याचा त्याचा नि:पक्षपात'. यांत नवे माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी इकोनॉमिक टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत प्रसारमाध्यमांना नि:पक्षपाती राहण्याचा सल्ला दिला आहे, याबद्दल लिहले आहे.

यांत सरळसरळ लिहले आहे की मोदींच्या विजयाला प्रसारमाध्यमांनी हातभार लावला आहे या बद्दल बहुतांश राजकीय तज्ञांचे एकमत होते. आदर्श पासून ते कोलगेट पर्यंत सगळे घोटाळे प्रसारमाध्यमांनी उघड केले. तसेच यूपीए-2 सरकार वर कठोर टिका केली. अग्रलेखात कॉंग्रेसचे नाव न घेता यूपीए-2 सरकार असे म्हंटले आहे. घोटाळे उघड केल्यामुळे तसेच टिका केल्यामुळे कॉंग्रेसचे नेते दुखावले होते. म्हणजे संपादक महोदय कॉंग्रेसला न दुखवन्याची काळजी घेत आहेत आणि 'कॉंग्रेसचे सरकार' किंवा 'कॉंग्रेस प्रणीत यूपीए-2 चे सरकार' न म्हणता फक्त यूपीए-2 सरकार म्हणतात. तसेच टिका करताना एनडीए-2 चे सरकार न म्हणता भाजप किंवा नुसते सरकार असे का म्हणतात. 

आता इथून पुढे चांगले काम केले तर एनडीए-2 चे सरकार आणि टिका करायची झाल्यास 'भाजप सरकार' किंवा 'मोदी सरकार' हे वारंवार घडत राहिल्यास आश्चर्य वाटणार नाही. लक्ष ठेवा. (कारण इथून पुढे कॉंग्रेसला पुन्हा गादीवर बसवण्यासाठी हे करावेच लागणार आहे आणि त्याची सुरुवात झाली आहे) तसे पाहिले तर मटाच्या नाकाला मिरच्या झोंबन्याचे कारण नव्हते. पण अशोक चव्हाण यांच्या पेड न्यूज़ प्रकरणात दोशी असलेल्यांकडून दूसरी काय अपेक्षा करणार !

दूसरा लेख विचार या सदराखाली सुनील चावके यांनी लिहला आहे. 

त्याचे नाव आहे 'मोदी सरकारच्या कार्यक्षमतेची कसोटी'. सुनील चावके तसे नि:पक्षपाती लिहतात. याचा अनुभव त्यांच्या मागील लेखावरून येतो. तरीही त्यांनी भाजप आणि मोदी सरकार असाच उल्लेख प्रत्येक ठिकाणी केला आहे. हे रालोआचे (NDA) सरकार आहे हे माहित नाही काय?

तीसरा लेख आहे 'धावते जग' मधे 'शत्रुघ्न सिन्हांचे टोले'. भाजपमध्ये वयाची पंच्या- हत्तरी ओलांडलेल्यां करिता वानप्रस्थाश्रम हाच मार्ग राहिल, या पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या अलिखित नियमाविरुद्ध शत्रुघ्न सिन्हा यांनी दंड थोपटले आहेत.

असे सगळे लिहून अडवाणी तसेच जोशी यांना मंत्रिपदे द्यायला पाहिजे होते असे सांगुन वयोवृद्धांची प्रशंषा केली आहे. तसेच सिन्हा इतक्या वेळा निवडून येवुनहि त्यांना मंत्रिपद दिले नाही यावर टिका केली आहे. हा लेख हे दाखविण्यासाठी आहेकी भाजप मधे आता भांडणे सुरु झाली आहेत. आणि मोदी चुकीचे वागत आहेत. सगळे जग तरुण राजकारण करनाऱ्या लोकांना पाठिंबा देत असताना मटा वयोवृद्धांची बाजु घेत आहे यात आश्चर्य नाही काय?

वरील सर्व लेखांवरून असा निष्कर्ष काढता येईल की मटा नि:पक्षपाती नाही अणि पूर्णत: कॉंग्रेसच्या आहारी गेलेला आहे. अभी तो ये शुरुवात है। पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त।

शुक्रवार, ३० मे, २०१४

मोदींना विरोध सुरु

मोदींना विरोध करण्याची विचारवंत आणि बुद्धिवंत तसेच तथाकथित धर्मनिरपेक्षवादी यांची धडपड सुरु झाली आहे. सोमवारी 26 मे 2014 ला मोदिंनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. आज त्यांच्या या पदाचा चौथा दिवस. खरे तर तीसरा. कारण संध्याकाळी सहा वाजता त्यांनी शपथ घेतली आहे. म्हणजे मागच्या तीन दिवसांत कायकाय विरोधी घडले त्याचा प्रथम आढावा घेऊ.

दि. 27.5.14- अशी बातमी आली की मनुष्यबळविकास मंत्री स्मृती इराणी यांनी चुकीचे शिक्षण दाखवले आहे. त्याला कॉंग्रेसचे अभिषेक मनू सिंघवी यांनी आक्षेप घेतला आहे. दहा वर्षांपूर्वी आपल्या निवडणुक शपथपत्रात त्यांचे शिक्षण पदवी असे दाखविले होते आणि आताच्या शपथपत्रात बी. कॉम. पार्ट वन पर्यंत शिक्षण झाले आहे असे दाखविले आहे. शिक्षनासंबन्धी निर्णय घेणारा मंत्री उच्च विद्याविभूषित असला पाहिजे असे त्यांचे म्हणणे. 
आजच्या मटा (दि. 29 मे) च्या अग्रलेखात कॉंग्रेसची चांगलीच चंपी केली आहे. (मटा भाजपच्या बाजूने लिहतोय हे एक आश्चर्य) अग्रलेखात म्हणलय 'वास्तविक कोणत्याही व्यक्तीची पात्रता त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी, शैक्षणिक पात्रता यांपेक्षा त्याची कार्यक्षमता, निर्णयक्षमता यावर ठरली पाहिजे; कारण कोणत्या कुटुंबात जन्माला यायचे याचे स्वातंत्र्य कोणाला नसते. शिक्षणाचा हक्क देण्याचा कायदा करावा लागणाऱ्या भारतासारख्या देशात दर्जेदार शिक्षण घेणेदेखिल अनेकांच्या आवाक्याबाहेरचे असते. त्यामुळे या सगळ्यावर एखाद्याची पत किंवा प्रतिष्ठा ठरविली जाणे सर्वार्थाने गैर आहे. कोणतीही थोर शैक्षणिक पात्रता नसताना सोनिया गांधी यांनी गेली दहा वर्षे हा देश चालवला. यामध्ये त्यांची चेष्टा करण्याचा हेतू नाही; (शेवटी हेही भितभितच) पण त्यांनी हे सिद्ध केले की शिक्षणाचा आणि देश चालवण्यासाठी लागणाऱ्या पात्रतेचा काही संबंध नाही.'

 (वासा फिरला की सगळेच फिरते अशी गत झालेय कॉंग्रेसची.) वसंतदादांचे उदाहरण देऊन बरेच काही लिहून कॉंग्रेसला सल्ला दिलाय की त्यांनी चुकुनही या वाटेला जाता कामा नये. आतापर्यंत म्हणजे 16 मे ला निकाल जाहिर झाल्यापासून मटाचे अग्रलेख मापूनतोलून असतात. पण आता शेजारीच भाजप विरोधी विचारवन्तांचे लेख छापून पोटातील गरळ ओकुन घेतात. ते पुढे पाहुच. दूसरी NDA विरोधी बातमी.

दि. 28.5.14 - शिवसेनेला बिनमहत्वाचे खाते दिले म्हणून अनंत गीते आणि शिवसेना नाराज. आता ही बातमी खरी की खोटी देव जाणे. परंतु NDA मध्ये भांडणे सुरु झाली आहेत हा या बातमीचा मुख्य उद्देश. कारण आजची बातमी अशी आहे की शिवसेनेला पुढील मंत्रीमंडळ विस्तरात चांगले खाते देण्यात येईल. त्यामुळे गितेंनी मंत्री पदाचा भार स्वीकारला. आता तुम्हीच सांगा की अशी नाराजी पत्रकारांना सांगायला काय गीते, उद्धव आणि शिवसेना वेडे किंवा बुद्धू आहेत काय?

आता मुख्य मुद्द्याकडे वळु. आजच्या मटा मधे अग्रलेखाच्या बाजुलाच छाया दातार
(स्त्री चळवळीतील कार्यकर्त्या) यांचा 'विचार' या सदराखाली 'विकासाच्या भपक्याने दिपली तरुणाई' हा लेख प्रसिद्ध झाला आहे. या बाईणे, अरेरे माफ करा मैडमणे कारण बाई म्हणणे काही जनिंना आवडत नाही. तर या मैडम ने मोदींच्या विजयाला तरुणाईला जबाबदार धरले आहे. त्यांच्या लेखातील ऐकेका मुद्यांचा विचार करू.

1.'एक तरुण सिग्नल हिरवा नसताना सिग्नल तोडून एका वृद्ध बाईला चाटून गेला आणि तिचा तोल जाताजाता वाचला. असे बरेच बाइकस्वार सुसाट वेगाने पुढे जात होते. हा केवळ वाहतुकबेशिस्तिचा प्रकार नाही तर मानसिकते मधील बदल आहे आणि तो गेल्या वर्ष-दोन वर्षातील आहे.'

असे बरेच काही लिहून मैडम ने तरुनाई ला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे.
मैडम ना असे तर म्हणायचे नाही ना  की कॉंग्रेसला आणखी वेळ द्यायला पाहिजे होता. इतके उतावीळ व्हायला नको होते. लोक गरीब राहिले म्हणून काय झाले. ठेविले अनंते (कांग्रेसणे) तैसेचि रहावे । चित्ती असू द्यावे समाधान । या बाई (येउदे राग) कुठल्या जगात वावरत आहेत. अहो बाई जमाना वेगाचा आहे. तुमच्या सारखा स्कूटरवर पाठीमागे बसून वाट पहाण्याचा नाही. तुम्ही हेही म्हणाल-
कॉंग्रेसने भ्रष्टाचार केला म्हणून काय झाले? देश तर त्यांच्याच बापाचा आहे. बापाचे पैसे खाल्ले त्याला भ्रष्टाचार म्हणायचे काय? वेडे तरुण कुठले ! एव्हढी काय घाई झाली होती की कॉंग्रेसला तुम्ही पूर्ण झोपवले. त्या राहुल बाळाला तोंड लपवायची पाळी आणली. 

जावयाने (रॉबर्ट वाड्रा) लाखाचे फक्त 300 कोटी केले तर तुम्ही कॉंग्रेसला पळता भुई थोडी केली? आपली संस्कृती काय ? जावयाला आपल्या संस्कृतीत किती मान? तुम्ही तरुण लोक आपली संस्कृतीच विसरले !

सगळ्या मंत्र्यांना हरवून मान खाली घालायला लावली. कारण तेही आपल्या जावयासारखेच ना? बरे त्या मनमोहन सिंगांचे काय चुकले ? 

मौनीबाबा म्हणून त्यांची हेटाळणी करता. आपल्या तुकोबारायांनी म्हंटलेच आहे ना ' तुका म्हणे उगे रहा, जे जे व्होइल ते ते पहा । कलमाडी साहेबांनी करोडो रुपये खाल्ले तेव्हा सिंग उगे राहिले.


ए. राजा आणि कळिमोळी 75 हजार कोटींचा घोटाळा केला तरी ते गप्पच राहिले.

कोळसा खानिंना परवानगी देतानाही ते निमूटपणे सह्या करीत राहिले. इतकेच काय राहुल बाबांनी भर पत्रकार परिषदेत कलंकित आमदार खासदार यांना संरक्षण देण्याचा कायदा फाडून कचऱ्याच्या डब्यात टाकला तरी ते काहीच बोलले नाहीत.
तुकारामांचे विचार त्यांनी किती तंतोतंत पाळले. बरे आपल्या तुकारामांचे जाऊद्या. महात्मा गांधींनी मौनाचे महत्व किती सांगितले आहे. अशा आदर्शाचा पाठ घालून देणाऱ्या माणसाच्या कॉंग्रेसला तुम्ही त्सुनामी प्रमाणे होत्याचे नव्हते केले ?

2. 'वर उल्लेख केलेल्या सिग्नल तोडन्याच्या प्रकाराला पूर्वी मी 'माजोरीपणा' असे म्हटले असते, आता मला नवीन शब्द सापडला आहे. मोदींच्या निवडणुकीनंतर 'हे तरुणाईच्या आशा अकांक्षांचे प्रतिक आहे' असे मानले जाऊ लागले आहे.'

आता ह्या बाइंना 'माजोरीपणाला' शब्द कुठला सापडला तर पूर्ण वाक्य. शब्द आणि वाक्य यातील फरक समजू नये या विदुषिन्ना? पण असं फक्त यांचेच झाले आहे असे नाही. झाडून सारे बुद्धिवंत आणि तथाकथित धर्मनिरपेक्षवादी यांचे असेच हाल चाललेत. आपण काय बोलतो आहोत, काय लिहतो आहोत हे त्यांना कळेनासे झालेय. या लेखावरील वाचकांच्या प्रतिक्रिया वाचल्या तर आपल्या लक्षात येईल. एकेकाने बाईची अशी खेचली आहेकी विचारता सोय नाही.

या बाई एकतर भाजप विरोधी किंवा कॉंग्रेसच्या कार्यकर्त्या असल्या पाहिजेत. कारण स्त्री चळवळच्या कार्यकर्त्या असलेल्या छाया दातार यांच्या हेही लक्षात येऊ नये काय की मोदी सरकार मधे सात मंत्री महिला आहेत. मोदिंनी महिलांना योग्य स्थान दिले याचा लेखात ओझरताही उल्लेख नाही. अभिनंदन नाही की शुभेच्छा नाहीत. यांत काही हितसंबंध तर गुंतले नाहीत ना ? याची शंका येते.

बाई झोपेत बरळताहेत असे लेख वाचून कोणीही सांगू शकेल. त्यांच्या लेखावरील वाचकांच्या प्रतिक्रियातर अवर्जुन वाचण्या सारख्या आहेत. मी आपलं बस करतो नाहीतर मीही बरळायला लागायचो. कारण वाईट संगतीने माणुस बिघडतो असा समज आहे. अच्छे दीन आने वाले है। मग आपण कशाला घाबरायचं !